मंडळी या जगात काय होईल याचा काही नेमचं राहिला नाही. आता हेच बघा ना, एका महिलेला अवघ्या ५ वर्षांच्या वयात आई बनवण्यात आले आणि ८ वर्षांच्या वयात तिला तीन मुले झाल्याचेही दाखवण्यात आले आहे! कुठे घडला आहे हा प्रकार आणि काय आहे यामागचं कारण? चला तर जाणून घेऊयात.
कुठे घडली घटना?
उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातली ही घटना आहे. अजितमल तहसीलमधील रामपूर गावात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनासह सामान्य लोकही आश्चर्याच्या धक्क्यात आहेत. येथील ग्रामपंचायतीच्या नोंदीत एका महिलेला अवघ्या ५ वर्षांच्या वयात आई बनवण्यात आल्याचे आणि ८ वर्षांच्या वयात तिला तीन मुले झाल्याचे दाखवण्यात आले आहे! हो, हा अजिबात विनोद नाही, तर स्वत: पंचायत प्रमुखांच्या स्वाक्षरीही कुटुंब नोंदणी वहीवर पाहायला मिळाल्या आहेत.
कटाचा भाग
सदर प्रकार ज्या महिलेबरोबर घडला तिचे नाव कमलेश आहे. कमलेश म्हणते की तिच्या मृत नवऱ्याची पत्नी म्हणून दुसऱ्या एका महिलेची नोंद त्याठिकाणी करण्यात आली आहे. तसेच तिच्या नावावर तीन मुले जोडण्यात आली आहेत. कमलेशने आरोप केला आहे की तिच्या सासरच्यांनी मालमत्ता हडप करण्यासाठी हा कट आखला आहे. त्यामुळे हे फेरफार करण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीने नोंदींमध्ये दाखवलेल्या ‘बनावट पत्नी’ची जन्मवर्ष १९८४ आहे, तर तिच्या तीन मुलांची जन्मतारीख अनुक्रमे १९८९, १९९० आणि १९९२ अशी नोंदवली गेली आहे. म्हणजेच, ही महिला ५, ६ आणि ८ वर्षांच्या वयात आई झाली. हे आकडे ऐकून प्रशासनही आश्चर्यचकित झाले आहे.
चौकशीचे निर्देश
ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (BDO) यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, चौकशी सुरू केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कारवाई केली जात आहे आणि जर आरोप खरे आढळले तर दोषींना सोडले जाणार नाही. दरम्यान, या प्रकारानंतर प्रशासनातील लोक कायद्याचा गैरवापर करुन जनतेशी खेळ करतात का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.