Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आजनिधन

shirish gavas facwbook photo shirish gavas facwbook photo
Spread the love

YouTuber Shirish Gavas passes away : Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं आज (दि.2) निधन झालंय. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. शिरीष गवस यांच्या निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरीष गवस हे कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मेंदूच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शिरीषला ब्रेन हॅमरेजचा त्रास होता.. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्याच्या घरी एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं होतं. शिरीषच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिरीषच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोना काळात पूजा आणि शिरीष यांनी मुंबईमधील आपलं वास्तव्य सोडून कोकणात स्थलांतर केलं होतं. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तर त्याची पत्नी ही JJ स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेली कुशल फाइन आर्टिस्ट असून, तिने पुढे पुण्यातील FTI मधून प्रॉडक्शन डिझाईनमध्ये शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये सात वर्षे आर्ट डायरेक्टर म्हणून काम केलं. कोकणात आल्यानंतर त्यांनी गावातील साधं, मातीच्या सुगंधाने भरलेलं जीवन, स्वतःच्या शेतात उगम पावलेलं अन्न, घरासमोरील बाग अशा प्रत्येक गोष्टीचं सुंदर दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपुढे मांडलं.

‘रेड सॉइल स्टोरीज’ या त्यांच्या यूट्युब चॅनेलवर सुरुवातीला पारंपरिक कोकणी खाद्यपदार्थांच्या रेसिपीज शेअर केल्या जात होत्या. त्यानंतर स्थानिक सण-उत्सव, शेती, जंगलातील नैसर्गिक संसाधने, स्थानिक जीवनशैली आणि संस्कृती यांचा सखोल मागोवा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. त्यांनी कधी भातशेती केली, कधी पारंपरिक पद्धतीने जेवण शिजवलं, तर कधी गावातील वयोवृद्धांची आठवणी जनमानसात पुन्हा जिवंत केल्या.

थोड्याच काळात त्यांचं चॅनेल 40 पेक्षा अधिक देशांतील प्रेक्षकांच्या नजरेत आलं. शहरातील आरामदायक जीवनशैली सोडून त्यांनी घेतलेला हा ठाम निर्णय इतका प्रभावी ठरला की त्यांनी केवळ स्वयंपूर्णता साधली नाही, तर कोकणातील वैभवशाली संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रभावी प्रचार करणारी एक महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *