वाराणसी : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या बनौली गावातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करणात आली. 20 व्या हप्त्याच्या माध्यमातून 9.7 कोटी शेतकऱ्यांना 2000 रुपये देण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 9 कोटी 70 लाख 33 हजार 502 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली. केंद्र सरकारनं 20 व्या हप्त्याद्वारे 20 हजार 500 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीची रक्कम कोणतेही मध्यस्थ, कोणत्याही कट कमिशनशिवाय, हेराफेरीशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते, असं म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचा सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 20 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. आज उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील बनौली गावातून 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली. आज शेतकऱ्यांच्या खात्यात 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा करण्यात आले असून यापूर्वी 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. तर, 18 व्या हप्त्याची रक्कम महाराष्ट्रातील वाशिम येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती.
पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. म्हणजेच पहिल्या हप्त्यापासून जे पात्र शेतकरी आहेत. त्यांना 20 हप्त्यांचे मिळून 40000 हजार रुपये मिळाले आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 6000 रुपये दिले जातात. 2 हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाते.
पीएम किसान योजनेचे पात्रतेच्या अटी?
संबंधित शेतकरी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे.शेतकऱ्याच्या नावावर शेती असावी. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. शेतकऱ्याला 10 हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळत नसावी. शेतकरी आयकर भरत नसावा.
एखाद्या शेतकऱ्याला नव्यानं नोंदणी करायची असल्यास त्याला पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथं New Farmer Registration वर क्लिक करा. आधार नंबर आणि कॅप्चा नोंदवा. माहिती भरल्यानंतर येस वर क्लिक करुन फॉर्म सबमिट करा.