मुंबई : कोरोनापासून वैद्यकीय क्षेत्रावरील दृढविश्वास कमी झाला असून वैद्यकीय क्षेत्र हे सेवा नाही तर व्यवसाय झाल्याची धारणा सर्वसामान्यांची बनली आहे. कारण, गेल्या काही वर्षात रुग्णांच्या जीवाशी होत असलेला खेळ, पैशासाठी रुग्णांना दिली जाणारी वागणूक आणि भरमसाठ बिलं पाहून डॉक्टर हे खरंच देव आहेत का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, गेल्या 2 पिढ्यांना वैद्यकीय सेवा अत्यल्प दरात पुरवणाऱ्या डॉक्टरांबद्दल आजही लोकांमध्ये आपलुकी, तितकाच आदर आहे. त्यामुळेच, अशा डॉक्टरांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वसामान्यांकडून आपल्याच घरातील कुणीतरी गमावल्याची भावना व्यक्त केली जाते. तर, ही समाजाची मोठी हानी असल्याची प्रतिक्रिया केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केली आहे.
केरळच्या कन्नूर येथे आपल्या क्लिनिकमध्ये पाच दशकांपासून केवळ 2 रुपयांत रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर ए.के.रायरू गोपाल (80) यांचे वार्धक्याशी संबंधित आजाराने रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. ज्यांच्याकडे पैसे नसत त्या रुग्णांना हे डॉक्टर मोफत औषधही देत होते. त्यामुळेच, डॉ. गोपाल लक्ष्मी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ होत असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. डॉ. गोपाल यांच्या लक्ष्मी या घरातच तयार केलेल्या क्लिनिकमध्ये पहाटे चार ते दुपारी चारपर्यंत रुग्णांवर उपचार करत होते. त्यांच्या क्लिनिकमध्ये दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असत. त्यांना जनतेचा डॉक्टर आणि दोन रुपयांचा डॉक्टर या नावाने ओळखले जायचे. त्यांची तब्येत ढासळत असल्यामुळे मागील काही वर्षे त्यांनी क्लिनिकची वेळ बदलली होती. त्यानुसार, सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचा दवाखाना रुग्णांसाठी खुला राहत होता.
वार्धक्याशी संबंधित आजारांमुळे त्यांना मे 2024 मध्ये क्लिनिक बंद करावे लागले होते. त्यामुळे या भागातील गरीब रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत. अखेर रविवारी डॉ. गोपाल यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या आठवणींना उजाळा देत गरिब रुग्णांवर मोफत उपचार करणारा देवमाणूस गेला, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. तर, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक, श्रद्धांजली अर्पण
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी डॉ. गोपाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. अर्ध शतक त्यांनी रुग्णांवर केवळ 2 रुपयांत उपचार केले. जनतेची सेवा करण्याच्या त्यांच्या इच्छेने रुग्णांना मोठा दिलासा मिळत होता, त्यांच्या मृत्यूने समाजाची मोठी हानी झाली आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.