Jitendra Awhad on Meat Ban : कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jitendra Awhad on Meat Ban : कल्याण-डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) प्रशासनाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या तसेच मोठ्या जनावरांची कत्तल करणारे सर्व कत्तलखाने या कालावधीत बंद राहतील. हा निर्णय 19 डिसेंबर 1988 रोजीच्या प्रशासकीय ठरावाच्या आधारे घेण्यात आला असून, बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी त्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात पालिका क्षेत्रातील सर्व कत्तलखाने चालकांना नोटीस पाठवून 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता पालिका प्रशासनाच्या निर्णयावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आक्षेप घेतला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कल्याण डोंबिवलीत मास विक्री बंद करण्यात येणार आहे. यांच्या बापाचे राज्य आहे का लोकांनी कधी काय खावे आणि विकावे याला कायद्यांनी काही बंदी दिली का? हा काय तमाशा आहे? बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. मनुष्य प्राण्याच्या दातची रचना बघितली तर कोणाला ही विचारा ही मांसाहारी आहे की नाही हजारो वर्षांचा इतिहास आहे. माकडा पासून आपण झालो, यात दाताची रचना झाली, यावरून कळत तुम्ही मांसाहारी आहात. ज्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी आमचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात, हा काय तमाशा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
शासन नावाचं काय आहे की नाही?
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, कल्याण डोंबिवली पालिका बहुजन समाजाला विरोध करतेय. माझं तर विचार आहे की, त्या ठिकाणीच मटणाची पार्टी ठेवणार आहे. ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान झालं. मराठी विरुद्ध हिंदी झालं. आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा. आदेश काढणारी ही गायकवाड बाई कोण आहे? तिला कोणी अधिकार दिलेला आहे? शासन नावाचं काय आहे की नाही? लोकप्रतिनिधी नाही, तिकडे उपायुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय हे सांगावं. शासनाने अधिक दिलाय का की कल्याण मुंबईमध्ये श्रीखंड पुरी खावे असे आदेश आहेत का? असे म्हणत त्यांनी बाजार व परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांच्यावर निशाणा साधलाय.