Manikrao Kokate: विधिमंडळात रमी खेळणारे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची अखेर कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखात्याचा कारभार काढून घेण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटेंकडे आता दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे असलेला क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आलाय. तर दत्तात्रय भरणे आता नवे कृषीमंत्री असणार आहेत. दरम्यान, कृषिमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदावरुन हटवून क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार दिल्यानंतर आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जो निर्णय घेतला आहे, तो मला मान्य आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. तसेच दत्तात्रय भरणेंना काही मदत लागली मी नक्की करेन आणि त्यांची मला मदत लागल्यास मी घेईन, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटेंनी दिली. तसेच नवीन खातं आवडलं का?, असं विचारताच I AM VERY HAPPY, असं माणिकराव कोकाटे म्हणाले.
अजितदादांनी एका दगडात मारले दोन पक्षी-
खातेपालटावर विरोधी पक्ष टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. क्रीडा आणि युवक खातं मिळाल्याने अजितदादांचे विश्वासू असलेलेल दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. दत्तात्रय भरणेंनी खातेवाटपानंतर ही नाराजी उघडही केली होती. मात्र आता कोकाटेंवरील कारवाई ही दत्तात्रय भरणेंसाठी एक लॉटरी ठरलीय. कृषिखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरील वर्णी ही भरणेंसाठी लॉटरीच मानली जातेय. एकीकडे कोकाटेंचा खातेपालट करत अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय. तर दुसरीकडे विश्वासू दत्तामामा भरणेंना कृषिखातं देत अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षा मारल्याची चर्चा रंगली आहे.