मुख्य बातम्या

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान -मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस 

divya deshmukh with cm (1) divya deshmukh with cm (1)
Spread the love

नागपूर : भारतीय बुद्धीबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुखने (Divya deshmukh) यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत जगभरात तिरंगा फडकवला. दिव्याने अवघ्या 19 व्या वर्षी हा दैदीप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला. त्यामुळेच, महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्यावतीने करण्यात आला. नागपूर येथील आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत, मला तिहेरी आनंद झाल्याचं म्हटलं. देश,महाराष्ट्र आणि नागपूरकर (Nagpur) म्हणून दिव्याचा विशेष अभिमान आणि कौतुक असल्याचं फडणवीसांनी म्हटलं. तसेच, दिव्यामुळे मंत्रिमंडळात आम्हालाही सन्मान मिळतो, असे म्हणत मंत्रिमंडळ बैठकीतील किस्साही मुख्यमंत्र्‍यांनी आपल्या भाषणात सांगितला. 

दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दिव्याकडून सर्वांना प्रेरणा मिळाली, यासाठी तिचा नागरी सत्कार करण्याचे आयोजन केले. दिव्यामुळे कॅबिनेट बैठकीत आमचा सन्मान होतो, दिव्याच्या अभिनंदनाचा ठराव घेताना छगन भुजबळ म्हणाले होते, नागपूरचे लोक बुद्धिबळात फार हुशार आहे, ते जास्तच बुद्धीमान दिसतात. मात्र, आम्ही राजकारणात बुद्धीबळ खेळतो, चेकमेट पण करतो, अशी मिश्कील टिपण्णी मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. 

क्रीडा मंत्रीपदी माणिकराव कोकाटेंचं पहिलं भाषण

आजचा दिवसा दिव्या हिच्या कष्टाचा गौरव करणारा आहे. दिव्याने महाराष्ट्र आणि देशाचं नाव मोठं केलं, ती केवळ भारताची कन्या नाही तर महाराष्ट्राची मृदूलता आहे. आज मी दिव्याचे आई-वडील आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो. मुलीला संधी दिली तर त्या जग जिंकू शकतात हेच दिव्याने दाखवून दिलं आहे. क्रीडा क्षेत्रात मुलींसाठी विशेष योजना आणू, दिव्यासारखे अनेक खेळाडू घडावे अशी इच्छा व्यक्त करत माणिकराव कोकाटे यांनी दिव्या तुझ्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे, असे आश्वासन दिव्याला दिले. दरम्यान, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमचा विभाग अग्रेसर असेल, मुख्यमंत्र्याच्या आदेशानं मी प्रयत्नाची पराकाष्टा करेल. महाराष्ट्राचा क्रीडामंत्री म्हणून आज माझा पहिला कार्यक्रम असल्याचेही कोकाटे यांनी म्हटलं. 

वर्ल्ड चॅम्पियनशीप पुढचे लक्ष्य

मी मनापासून आभार प्रकट करते की माझा सत्कार केलाय. हा माझ्यासाठी खास क्षण असून असे क्षण जीवनात अभावानेच येतात. मला महाराष्ट्र सरकारने बऱ्याच वेळात मदत केलीय. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी इथे एक मॅच आयोजित केली होती. त्यामुळे मला यात वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली. नागपूर माझ्यासाठी खास आहे, हे माझं घर आहे. जगात मी कुठेही जाते, पण मला नागपूर माझं घर वाटते. यापुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप माझे पुढचे टार्गेट आहे, मला आशा आहे की मी पहिली नागपूरकर मुलगी ठरेल जिला हा सन्मान मिळेल, असा आशावाद दिव्याने आपल्या भाषणात व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *