कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका विवाहित पुरूषाला अटक करण्यात आली आहे. प्रेमात अपयश आल्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधीचे वृ्त्त एनडिटीव्हिने दिले आहे.
काय आहे प्रकरण?
३२ वर्षीय श्वेता पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर ती पालकांच्या घरी राहायची. उपजीवीकेसाठी ती कामाला जात असे.
कामावरच तिला रवी नावाचा विवाहित आरोपी भेटला. त्यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. दोघे एकमेकांबरोबर कामानिमित्त बोलायचे. त्यानंतर रवीने श्वेताला प्रेमाचा प्रस्ताव दिला होता. पण श्वेताला त्याचे असे वागणे आवडले नाही. असे असताना रवीने श्वेताने हा प्रस्ताव स्वीकारावा यासाठी विविध आमिषं द्यायला सुरुवात केली.
श्वेताने प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला तर तो त्याच्या पत्नीला सोडून द्यायला तयार असल्याचे वचनही त्याने श्वेताला दिलं होतं पण श्वेताला रवीचं प्रेम आणि असं वागणं मान्य नव्हतं.
प्रेमाला नकार दिला
श्वेताला मात्र रवीबरोबर प्रेमसंबंधात कोणताही रस नव्हता. त्यामुळे तिने त्याला नकार दिला. या नकारानंतर रवीला प्रचंड राग आला. हा नकार पचवता न आल्याने त्याने श्वेताचा काटा काढायचा विचार करायला सुरूवात केली. त्याने श्वेताला भेटायला बोलावले आणि त्याच्या चारचाकी गाडीमध्ये श्वेता बसलेली असताना गाडी थेट चंदनहल्ली तलावात नेली. स्वत: रवी पाण्यातून पोहत बाहेर आला पण श्वेता मात्र पाण्यात बुडाली व प्राणाला मुकली.
बचावकार्य आणि गुन्हा
यानंतर पोलिसांनी संबंधीत घटनेमध्ये बचावकार्य सुरू केले. कारसह श्वेताचा मृतदेह बाहेर काढला. गुन्हा दाखल करुन आरोपीची चौकशी केली तेव्हा रवीने हा एक अपघात असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतू श्वेताच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयास्पद परिस्थिती पाहता त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि रवीच्या मुसक्या आवळल्या.
