Donald Trump Tariff On India : रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीमुळे अमेरिका भारतावर पुन्हा एकदा संतापला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी दिली. ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला की तो रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करून, ते आंतरराष्ट्रीय बाजारात महाग विकतो आणि मोठा नफा कमावतो. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारताला रशिया-युक्रेन युद्धात होणाऱ्या मानवी नुकसानीची पर्वा नाही. त्यामुळे भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ वाढवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आधीच लावला 25 टक्के टॅरिफ
गेल्या आठवड्यातच ट्रम्प प्रशासनाने भारताकडून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के टॅरिफ लागू केले. याशिवाय, रशियाकडून लष्करी उपकरणे आणि ऊर्जा खरेदीबाबत अतिरिक्त दंड लावण्याची शक्यता असून, याबाबतचा निर्णय लवकरच घोषित होणार आहे.
भारताचा ठाम विरोध
या निर्णयाला भारत सरकारकडून स्पष्ट प्रतिक्रिया आली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितले की, “अमेरिकेसोबत 10 ते 15 टक्के टॅरिफबाबत चर्चा सुरू होती. मात्र, 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय एकतर्फी आहे. राष्ट्रीय हितासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.”
रशियन तेल खरेदीमागील भूमिका
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर आक्षेप घेतला आहे. या खरेदीचा फायदा थेट मॉस्कोच्या युद्धयंत्रणेला होतो असे ते म्हणाले. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की, “भारत आपल्या ऊर्जा गरजा जागतिक परिस्थिती आणि उपलब्धतेनुसार ठरवतो. आमचे निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय गरजा आणि स्वावलंबन यावर आधारित असतात.”
भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ फक्त व्यापार संबंधावरच नव्हे, तर जागतिक राजकारणावरही परिणाम करू शकतो. अमेरिका आणि भारत या दोन महत्त्वाच्या भागीदार देशांमध्ये निर्माण होणारे हे तणाव भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 रोजी जाहीर केलं की, ज्या देशांसोबत व्यापार तूट आहे, त्या देशांच्या आयातीवर 50 टक्के पर्यंत टॅरिफ लावलं जाईल. त्याचबरोबर, सर्व देशांवर एकूण 10 टक्के बेसलाइन टॅरिफही लागू करण्यात आले.
Donald Trump Tariff : कोणत्या देशांना सर्वाधिक फटका?
भारत – 25%
ब्राझील – 50%
कॅनडा – 35%
स्वित्झर्लंड – 39%
तैवान – 20%
सिरिया – 41%
पाकिस्तान – पूर्वी 29%, आता 19% (ऑईल डीलनंतर)