Mahadevi elephant Kolhapur: या हत्तीणीला २०१२ पासुन ते २०२३ पर्यंत तेरा वेळा महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये बहुतेक वेळा वनखात्याच्या योग्य परवानगीशिवाय नेण्यात आले होते.
- महादेवी कोण आहे ? ( स्थानिक रित्या माधुरी म्हणून ओळखली जाणारी हत्तीण )
महादेवी ही ३६ वर्षीय आशियाई हत्तीण असून तिने गेली ३३-३४ वर्षे कोल्हापूर, नांदणी येथील स्वस्तीश्री जिनसेन बहत्तरक पट्टाचार्य जैन मठात काढली. तिला मोठ्या प्रमाणावर गुडघेदुखी, सांधेदुखी, पायांना गॅंगरीन होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर वाढलेली नखे या समस्या असून देखील तिला धार्मिक प्रथा-परंपरांचा भाग म्हणून गावातील मिरवणुकांमध्ये नेले जात असे. तिला ठेवलेल्या जागी जमिनीचा पृष्ठभाग धातुसदृश्य कडक असल्याने हे तिचे आजार आणखीनच वाढत गेले.
२. तिला वनतारामध्ये का हलविण्यात आले ?
प्राणिमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी या हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमली. या हत्तीणीवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी तिला नेऊन तिचे पुनर्वसन करावे, अशी शिफारस या समितीने एकमताने केली. १६ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली आणि तिला जामनगर येथील राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट (वनतारा) मध्ये दोन आठवड्यात हलवण्याचा आदेश दिला.
३. सर्वोच्च न्यायालयात काय झाले ?
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. २९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्य पिठाने ही रिट याचिका फेटाळून लावली आणि महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे, यावर भर देऊन तिचे वनतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब केले. या हत्तीणीची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणे, या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतल्या.
४. वनताराने या हत्तीची निवड केली ? की हा सर्व घटनाक्रम आपोआप घडलेला आहे ?
या सर्व कायदेशीर प्रक्रियेत वनतारा पक्षकार नव्हते. केवळ न्यायालयाच्या आदेशाने आम्हाला ( वनताराला ) या हत्तीणीला येथे हलवून तिच्या पुनर्वसनाचा आदेश देण्यात आला. जेव्हा वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ञ या हत्तीणीला वनतारामध्ये सुरक्षितरित्या सोडण्यासाठी आले तेव्हाच वनताराची भूमिका सुरू झाली. तेव्हापासून आम्ही हेच सर्वांना पटवून देत आहोत की महादेवीला वनतारामध्ये हलवण्याचा निर्णय हा न्यायालयाचा होता आणि हा निर्णय वनतारामुळे घेण्यात आला नाही.
५. वनतारामध्ये प्राण्यांसाठी कोणकोणत्या सोयी आहेत आणि वनताराचे संचालन कोण करते ?
वनतारा हे गुजरातच्या जामनगर मध्ये साडेतीन हजार एकरांवर पसरलेले वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र आहे. याच्यात २,००० प्रजातींचे दीड लाख प्राणी आहेत. वनतारामध्ये पशुसंवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांचा दर्जा पाहून ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने वनताराला प्राणिमित्र राष्ट्रीय पुरस्कार (कंपनी गट ) दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे वनतरा हे पर्यटन प्राणी संग्रहालय नाही. येथे पर्यटकांना किंवा पाहुण्यांना प्रवेश नाही. त्यायोगे येथील प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल तसेच त्यांना जास्तीत जास्त एकांत मिळेल याची काळजी घेतली जाते.
६. वनतारामध्ये आता महादेवीची सध्याची स्थिती काय आहे ?
महादेवी वनतारा मध्ये ३० जुलै २०२५ मध्ये आल्यापासून तिला विशेष पशुवैद्यक उपचारांखाली ठेवण्यात आले आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.
- तिच्या सांधेदुखीवर इलाज म्हणून रोज जल उपचार तळे.
- एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड आदी रेडिओलॉजिकल रोगनिदान.
- नियमित फिजिओथेरपी उपचार आणि संतुलित खाणेपिणे.
- साखळदंडविरहित मऊ पृष्ठभागाची राहण्याची व्यवस्था आणि अन्य हत्तींबरोबर एकत्र येण्याची संधी.
या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचे चलनवलन सुधारत असल्याचे लगेच दिसून आले आहे. महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेने व्यक्त करीत आहे. तसेच अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे.
७. महादेवीला कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का ?
महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वनताराने दिले आहेत. मात्र त्यासाठी खालील बाबींची पूर्तता आवश्यक आहे.
- त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्याने तसेच जैन मठाने न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे.
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आले पाहिजे.
- जर आणि जेव्हा न्यायालयाने तसा आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेने पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी आहे.
८. या प्रकरणात वनताराची प्राथमिक भूमिका काय होती ?
- उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्यानुसार या हत्तीणीचे हित जोपासणे हे प्रमुख उद्दिष्ट
- कायदेशीर उत्तरदायित्व, जबाबदारी आणि पारदर्शकता यांचे पालन करणे. यात तिच्या प्रकृतीचे संपूर्ण वैद्यकीय अहवाल आणि तटस्थ निरीक्षकांचे पाहणी अहवाल यांचा समावेश आहे.
- या प्रकरणात समाजाच्या भावनांचाही विचार करणे म्हणजेच महादेवी ची सुरक्षा आणि प्रतिष्ठा यांचा विचार करता धार्मिक प्रथांमध्ये प्रत्यक्ष हत्तीला नेऊ नये तर त्याऐवजी हत्तीची यांत्रिक प्रतिमा वापरली जावी.