Narendra Modi Speech On Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला असं नरेंद्र मोदी म्हणाले.
Narendra Modi Speech : नरेंद्र मोदींचे भाषण
पहलगामवरील हल्ला म्हणजे भारताला हिंसेचा खाईत लोटण्याचं आणि देशात दंगे करण्याचा प्रयत्न होता. पण देशवासियांच्या एकीमुळे तो प्रयत्न फसला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाढणार असा संकल्प मी त्यावेळी केला होता. या हल्ल्याची सजा दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना मिळणार. 22 एप्रिल रोजी हा हल्ला झाल्यानंतर मी परदेशातून लागोलाग आलो. त्या दिवशी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असा निश्चय केला.
आमच्या सैन्यबलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरतात.
भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानी एअरबेस आजही आयसीयूमध्ये आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने त्यांची ताकद दाखवली. पाकिस्तानने दिलेल्या न्यूक्लिअर धमक्यांना भारताने भीक घातली नाही.
या आधी दहशतवाद्यांना पोसणारे निश्चित असायचे. एखादा हल्ला केला तर त्या मागचे आका निवांत असायचे. पण आता त्या आकांना झोप येत नाही. त्यांना माहिती आहे, असं काही केलं तर भारत येईल आणि त्यांना सोडणार नाही. सिंधू पासून ते सिंदूरपर्यंत भारताने कारवाई केली आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवला.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळालं पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही हे दुर्दैव.
पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केलं. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होतं. काँग्रेसला ना भारताच्या समार्थ्यावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर.
10 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्याची घोषणा केली. पण इथल्या काही लोकांनी सैन्यावर विश्वास न दाखवता अफवा पसरवण्यावर भर दिला.
सर्जिकल स्ट्राईकवेळीही असंच घडलं. त्यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील लष्करी तळं उद्ध्वस्त केली. बालाकोट एअर स्ट्राईकवेळीही दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर कारवाई केली, ते नष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरवेळीही लक्ष्य निश्चित होतं. दहशतवाद्यांना ज्या ठिकाणाहून मदत मिळाली, ज्या ठिकाणी योजना तयार करण्यात आली त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली
2 मेच्या मध्यरात्री आणि 10 मेच्या पहाटे, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक तळांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने असा हल्ला केला की पाकिस्तानने त्याचा विचारही केला नव्हता. त्यामुळे पाकिस्तान गुडघ्यावर आले. त्यावेळी पाकिस्तानचा पहिला फोन आला. डीजीएमओला पाकिस्तानकडून फोन आला आणि भारताला हल्ले थांबवण्याची विनंती केली.
ट्रम्प यांनी मध्यस्ती केल्याचं फेटाळलं
आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होतं. भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय.
9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार.
काँग्रेस पाकिस्तानवर निर्भर होत चाललंय
पाकिस्तानने जर यापुढे असं काही केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. आजचा भारत हा आत्मविश्वासाने भरला आहे. आजचा भारत हा आत्मनिर्भर आहे. एकीकडे भारत गतीने पुढे जात आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मतांसाठी पाकिस्तानवर निर्भर होत आहे. काँग्रेसकडून राजकारणासाठी जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे.