२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने आज (३१ जुलै) रोजी निकाल दिला आहे. न्यायालय म्हणाले की भोपाळ आणि फरीदाबाद येथे बॉम्सफोटाचे कट रचण्यात आल्याचे कोणतेही विश्वसनीय पुरावे आढळले नाहीत. “बॉम्ब ठेवण्यात आलेली दुचाकी प्रज्ञा ठाकूर ठाकूर यांच्या नावावर नोंद असल्याचं सिद्ध होत नाही”, असे न्यायाधीशांनी निकालात सांगताना सर्व आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.
न्यायालय नेमके काय म्हणाले?
हा निकाल देताना न्यायालय म्हणाले की, “एटीएस आणि एनआयएच्या आरोपपत्रांमध्ये खूप फरक आहे. दुचाकीमध्ये बॉम्ब होता हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. प्रसाद पुरोहित यांच्याबाबत बॉम्ब बनवण्याचा किंवा त्याचा पुरवठा करण्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. त्याशिवाय बॉम्ब कोणी ठेवला हेही सिद्ध झाले नाही. घटनेनंतर तातडीने पुरावे गोळा केले नाही, त्यामुळे पुराव्यांशी छेडछाड झाली. स्फोटानंतर पंचनामा योग्यरित्या करण्यात आला नाही, घटनास्थळावरून बोटांचे ठसे घेतले गेले नाही दुचाकीचा क्रमांक जप्त करण्यात आला नाही. दुचाकी साध्वी प्रज्ञा यांच्या नावावर आहे हे देखील सिद्ध होऊ शकले नाही.”
काय होतं प्रकरण?
मालेगावमधील एका मशिदीजवळ दुचाकीमध्ये ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात ६ जणांचे प्राण गेले होते. तर शेकडो लोक जखमी झाले होते. एटीएस सीबीआय एनआयए या तपाससंस्थानी प्रकरणाचा तपास केला. दरम्यान, १७ वर्षांनंतर हा निकाल आज न्यायालयाने दिला आहे.